जेलमधून बाहेर येताच विनयभंगाच्या आरोपावर पहिल्यांदाच बोलला अभिनेता विजय राज ! म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता विजय राज (Vijay Raaz) याला शेरनी (Sherni) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सेटवरील महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अलीकडेच अटक झाली होती. आता तो जामिनावर बाहेर आला आहे. यानंतर निर्मात्यांनी विजयला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. यावर आता त्यानं पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. मीसुद्धा 21 वर्षांच्या मुलीचा बाप आहे असं तो म्हणाला आहे.

एका मुलाखतीत बोलताना विजय राज म्हणाला, महिलांची सुरक्षा, त्यांचा आदर हे सगळं मला कळतं. मीदेखील 21 वर्षांच्या मुलीचा बाप आहे. मला सिनेमातून काढलं गेलं. हे खूप वाईट आहे असंही तो म्हणाला आहे.

काय म्हणाला विजय राज ?
मुलाखतीत बोलताना विजय राज म्हणतो, मी खूप कष्टानं माझं करिअर उभं केलं आहे. कोणी जाणीवपूर्वक एखाद्याचं करिअर कसं उद्ध्वस्त करू शकतं. कोणी काहीही बोलेलं की, मी शोषण करणारा आहे. हे तुम्ही खरं कसं मानू शकता. चौकशीआधीच मी दोषी आहे हे तुम्ही कसं ठरवू शकता. माझे वृद्ध वडील दिल्लीत आहेत. त्यांना आणि माझ्या मुलीला समाजाचा सामना करावा लागणार आहे.

पुढं बोलताना विजयनं सांगितलं, एका वर्षापासून मी या टीमसोबत काम करत आहे. आम्ही सेटवर एकत्र क्रिकेट खेळायचो. ती महिला सेटवर अंन्कफर्टेबल आहे हे जाणवताच मी तिची माफी मागितली होती, तीदेखील पूर्ण टीम समोर. सॉरी म्हटलं म्हणजे नेहमी तुमचीच चूक आहे असा अर्थ होत नाही. सॉरीचा अर्थ असा होतो की, तुम्हाला समोरच्याच्या भावनांची काळजी आहे.