काय सांगता ! होय, Google Map ने दाखविली महाराष्ट्रातील गावे गुजरात राज्यात

पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने घुसखोरी करुन पथदिवे उभाल्याने सीमेचा वाद सुरु आहे. यातच गुगल मॅपने नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात दाखवल्याने नव्या वादाला तोंड फुडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गुजरात राज्य महाराष्ट्रातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावात नेहमीच हद्दीचा वाद करुन अतिक्रमण करीत असते. याशिवाय वेवजी गावातील ग्रामस्थांचा व गुजरात राज्यातील उंबरगाव येथील यंत्रणेचा नेहमीच वाद होत असतो. त्यातच गुगल मॅपने वेवजी गाव गुजरात राज्यात दाखवले आहे. गुगल मॅपने तलासरी तालुक्यातील वेवजी गाव, इंडिया कॉलनी, मेहरणोस बोमान इंग्लिश शाळा तसेच मोठा भूभाग गुजरात राज्यात दाखवल्याने यामध्ये मोठे कारस्थान असल्याची शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे.

गुगल मॅपने वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं. 204 चा मोठा भूखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर. 173 या दोन भुखंडावर दोन राज्यांची सिमा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या रहात आहेत. महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतीच्या हद्दीवर महाराष्ट्र गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्यात याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

यासंदर्भात तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भारतीय सर्वेक्षण विभागाला पत्र पाठविले जाईल, असे सांगितले.

तर तलासरीचे प्रांत अधिकारी अश्विनी मांजे यांनी सांगितले की, गुगल नकाशामध्ये महाराष्ट्रातील सीमेलगतची गावे गुजरात राज्यात चुकिच्या पद्धतीने दाखवली जात आहेत. यामध्ये दुरुस्ती करुन नवीन नकाशा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

वेवजी गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांनी सांगितले की, महाराष्ट्र गुजरात राज्यातील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्द ठरवणारा भुखंडाचा फेरफार क्र 286 चा सर्वे नं 204 चा सातबारा महत्त्वाचा आहे. सातबारा मिळणेबाबत तहसीलदार, तलासरी यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र सातबारा मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात घुसखोरी वाढत असल्याचे अशोक धोडी यांनी सांगितले.