पंढरपुरातील विठ्ठल मंदिर धोक्यात, पुरातत्व विभाग करणार स्ट्रक्चरल ऑडिट 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन- लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे मंदिरच धोक्यात आले आहे. मंदिराच्या मूळ वास्तूच्या परिसरात बांधण्यात आलेल्या अवास्तव बांधकामामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेली बाधकामे हटवून गाभाऱ्यातही बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज केला आहे.

मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली बांधकामे यामुळे छतावर भार वाढला आहे. हा भार मूळ मंदिरावर येत असल्याने मूळ मंदिराच्या वास्तूस धोका निर्माण झाला आहे. असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. पुरातत्व विभागाकडून संपूर्ण मंदिराचे ऑडिट करण्यात येणार असून यानंतर कोणता बदल करायचा याचा अहवाल मंदिर समितीला देण्यात येणार आहे.

विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असल्याचे मानले जात असले तरी अनेक अभ्यासकांच्या मते ही वास्तू त्या काळाच्याही पूर्वीची असल्याचे सांगितले जाते. मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून त्याच्या यादवकालीन साधर्म्याची अनेक उदाहरणे इथल्या शिल्पकलेवरून दिसून येतात. वास्तविक मंदिर जरी अकराव्या शतकातील असले तरी यानंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाला वाटतो आहे.

यानंतरच्या काळात मात्र मूळ मंदिराच्या छतावर जाडजूड स्लॅब टाकण्यात आल्याने मूळ मंदिरावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  यातच हवा खेळण्यासाठी मंदिराच्या छतावरील अनेक ठिकाणाची मूळ दगड काढून तिथे हवा बाहेर जाण्यासाठी मोठ्या आकाराची सवणे केल्याने वास्तूचे छत कमकुवत झाले आहे. यातच छतावर विविध प्रकारची बांधकामे, वातानुकूलित यंत्रणेचा बेस अशा पद्धतीचा बोजा वाढत गेल्याने मूळ मंदिरावरील बोजा वाढला आहे. यामुळे मंदिराचे दगडी बीम क्रॅक झाले असण्याची भीती पुरातत्व विभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत. याचबरोबर मूळ मंदिरातील पुरातन दगडू काही ठिकाणी निसटू लागली असून काही ठिकाणी दगडी वास्तूला भेगा पडू लागल्या आहेत.

अकराव्या शतकात विठ्ठल मंदिराचे मूळ मंदिर हे विठ्ठल गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी एवढेच मर्यादित होते मात्र नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला.  मंदिराचा मुख्य भाग असणाऱ्या विठ्ठल गाभाऱ्यात देखील नंतरच्या काळात अवास्तव दुरुस्त्या केल्याने मूळ वास्तूच्या स्ट्रक्चरलाच धोका निर्माण झाला आहे. गाभाऱ्यात भितींवर लावलेल्या ग्रॅनाईट व संगमरवरी फरशांमुळे गाभाऱ्यातील आर्द्रता मूर्तीस घातक बनू लागली आहे.