ऐन निवडणुुकीच्या तोंडावर AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी जाहीर केला राजकीय संन्यास, तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन – तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र असे असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर एआयएडीएमकेच्या नेत्या तसेच माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निवडणुकीआधीच मोठी खळबळ उडाली आहे. 66 कोटींच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत शशिकला यांनी एक निवेदन जारी करत एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे आणि डीएमकेला विधानसभा निवडणुकीत पराभूत करावे असे आवाहन केले आहे.

शशिकला म्हणाल्या की, तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार बनावे म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करत आहे. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणार असून जयललिता यांच्या मार्गावरच चालणार आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणूकीत माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव भासणार आहे. तसेच सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणातील माघार, अभिनेते कमल हसनची राजकारणातील एन्ट्री तसेच भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर येथील निवडणूक रंगदार होण्याची शक्यता आहे. दरम्यान तामिळनाडूत 234 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.