TMC च्या दणदणीत विजयानंतर भाजपा खासदाराची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘बंगाली जनतेने क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली’

पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत शक्तीशाली भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दारूण पराभव केला आहे. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसीने 213 जागा जिंकत सलग तिस-यांदा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी व भाजपाच्या काही नेत्यांनीही ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या. पण बंगालमधील भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र बॅनर्जींना शुभेच्छा देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर क्रूर महिलेला पुन्हा सत्तेवर आणून बंगालच्या मतदारांनी ऐतिहासिक चूक केल्याची टीकाही सुप्रियो यांनी केली.

ममता बॅनर्जी या पुन्हा सत्तेवर येणार हे स्पष्ट झाल्यानंतर खासदार सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. मी ममता बॅनर्जींना शुभेच्छा देणार नाही किंवा मी जनादेशाचा आदर करतो असेही म्हणणार नाही. भाजपाला संधी न देऊन बंगालच्या जनतेने भ्रष्ट, असमर्थ, अप्रामाणिक सरकार आणि एका क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केल्याची पोस्ट सुप्रियो यांनी केली.

लोकशाही असलेल्या देशातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाचे मी पालन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. थोड्याचवेळात या पोस्टवरुन टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर मात्र त्यांनी ही फेसबुक पोस्ट डिलिट केली. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ताशिखर गाठले आहे.