तीन मुलांची हत्या करून वडीलांचाही आत्महत्येचा प्रयत्न…

अकोला :  पोलीसनामा ऑनलाई

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोतरडी येथे वडिलांनीच स्वतःच्या पोटच्या 3 मुलांची हत्या करून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या बाबत सविस्तर असे की धोतर्डीत येथे वडिलांनी आपल्या मुलांना आधी विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम न झाल्याने 2 मुलांना शॉक देऊन ठार केले तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंट्याने घाव करून ठार केले. त्यानंतर स्वत: ला इजा करून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकरणात तिन्ही मुलांचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाला आहे. विष्णू इंगळे असे या वडिलांचे नाव असून मृतकांमध्ये अजय, मनोज आणि शिवानी या तीन मुलांचा समावेश आहे. सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना देऊन देखील पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहचू शकले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.