आम्ही ब्राह्मणवादाच्या विरोधात : छगन भुजबळ

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन – आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात कधीच नाही, स्वतः महात्मा फुले देखील ब्राम्हणांच्या विरोधात नव्हते मात्र, आमचा विरोध हा ब्राह्मणवादाला आहे. सत्तेत असलेले भाजप सरकार हे मनुवादी सरकार आहे. या सरकारने सर्वसामान्य नागरिकांची, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. ते धुळे तालुक्यातील सोनगीर येथे ओबीसी समाजाच्या समता मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या शेवटी मनुस्मृती या ग्रंथाचे सामुहिक दहन करण्यात आले.

या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या हस्ते सोनगीर येथे माळी समाज मंगल कार्यालयाचं उदघाटन करण्यात आले. यानंतर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. काँग्रेसच्या काळात मूठभर पैशात पिशवीभर सामान येत होते, आता पुन्हा हे सरकार सत्तेवर आल्यास पिशवीभर पैशात मूठभर सामान येईल. मोदींनी नोटबंदीच्यावेळी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं. जीएसटी लागू झाल्यामुळे व्यापाऱ्यांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

नोटबंदी केल्यास आतंकवाद थांबेल असे मोदींनी म्हटले होते. मात्र, त्याचे काय झाले? आज दिल्लीत राज्यघटना जाळली गेली मात्र एकावरही या सरकारने कारवाई केली नाही. गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत, काँग्रेसच्या काळात मूठभर पैशात पिशवीभर सामान येत होत आता पुन्हा हे सरकार सत्तेवर आल्यास पिशवीभर पैशात मूठभर सामान येईल अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर केली. तसेच यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्यावरदेखील जोरदार टीका केली.