भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान ! ‘सहानुभूतीसाठी ममतादीदींची हत्या आम्हाला नको’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  होऊघातलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. दरम्यान, “जर ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केंद्रीय सुरक्षा संस्थेकडून स्वतःसाठी सुरक्षा घ्यावी. आमची इच्छा नाही की, त्यांच्या भाच्याला बंगालच्या लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी त्यांची हत्या व्हावी,” असं वक्तव्य पश्चिम बंगालमधील बॅरकपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी टीएमसीच्या सर्वेसर्वो तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल केलं.

दरम्यान, जर भाजपला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवता आला नाही तर ममता बॅनर्जींची हत्या केली जाऊ शकते, असं वक्तव्य ममता सरकारचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी डिसेंबरमध्ये केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पश्चिम बंगालचे राजकारण तापले होते. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनीही सुब्रत मुखर्जी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला होता. “राज्य सरकारला जनतेचा पाठिंबा मिळत नाहीये. सहानुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारची शेरेबाजी केली जात आहे. त्या म्हणत आहेत की, काही लोक त्यांची हत्या करण्याचा कट रचत आहेत. परंतु, कोणी असा गुन्हा का करेल ? विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी ते अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता. असं भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले होते.