तेलतुंबडेंवर होणारी कारवाई चुकीची ; आम्ही त्यांच्या पाठीशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यावर होत असलेली कारवाई चुकीची आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, असं निवृत्त न्या. बी.जी. कोळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. तेलतुंबडेंसह इतर दहा कार्यकर्त्यांविरोधात होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज पुण्यातील महात्मा फुले वाड्यात पुरोगामी संघटनांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबतीत दिलेला निकाल बदलावा अशी मागणी देखील कोळसे पाटील यांनी केली आहे.

एल्गार परिषदप्रकरणी झालेली कारवाई म्हणजे पोलीस खोटी केस कशी करतात हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर ढवळे आणि मी आम्ही दोघेच एल्गार परिषदेचे संयोजक होतो. त्याचा आणि कारवाई झालेल्या ११ जणांचा काहीही संबंध नाही. या लोकांची आणि आमची ओळख नाही तसेच तेलतुंबडेंचा आणि आमचा सुतराम संबंध नाही. मोदींच्या हत्येच्या कटाशी याचा संबंध पोलिसांनी जोडला हे चुकीच आहे. परिषदेच्यावेळी व्यासपीठावर केलेलं डेकोरेशन दुसऱ्या दिवशी असणाऱ्या एमआयटीच्या कार्यक्रमासाठी करण्यात आलं होतं.
त्यामुळे सरकारनं या खोट्या केसेस टाकल्या आहेत. यामागे त्यांचा हेतू काय हेच आम्हाला कळत नाहीय. वैचारिक विरोधकांवर संघटीत गुन्हेगारीची कलमं लावणं हा सरासर अन्याय आहे. आमच्या नावाखाली या लोकांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या पाठीशी उभं राहण हे आमचं काम आहे, असं कोळसे-पाटील यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, आनंद तेलतुंबडे यांना आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ते संरक्षण काढून घेतली आहे. त्यामुळे तेलतुंबडेंना कधीही अटक होऊ शकते.