कोल्हापूर शहरात प्राणघातक शस्त्रसाठा जप्त; दोघांना अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दुधाळी परिसरातील धुण्याच्या चावी येथे सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कृपालसिंग सोहनसिंग टाक (वय ३८ रा. आसरेनगर, निपाणी) व सुरेश रामचंद्र भंजोडे (वय ५०, रा. प्रतिभानगर, निपाणी) या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन तलवारी, पाच कुकरी, दोन गुप्ती अशी प्राणघातक शस्त्रे जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन व्यक्ती प्राणघातक शस्त्रे घेऊन कोल्हापुरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना खबऱ्याकडून समजली होती. त्यानुसार सावंत यांनी आपल्या पथकाच्या मदतीने दुधाळी परिसरात सापळा रचला.

दुपारी पोत्याच्या पिशवीत शस्त्रे घेऊन जाणाऱ्या कृपालसिंग व सुरेश यांना संशयावरून पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये तलवार, कुकरी व गुप्ती अशी ९ धारदार शस्त्रे मिळून आली. ती हस्तगत करण्यात आली असून ही शस्त्रे आली कोठून, कोणाला देणार होते, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.