आजचे हवामान : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, लाटेची शक्यता, ‘या’ 4 राज्यात जोरदार पावसाचा ‘अलर्ट’

नवी दिल्ली : बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो सोमवारी मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार दिवस तामिळनाडु, पुदुचेरी, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात यावेळी आणखी कडाक्याची थंडी पडू शकते. तसेच थंडीची लाट येऊ शकते. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) रविवारी ही माहिती दिली.

तामिळनाडुत मत्स्य विभागाचे मंत्री डी जयकुमार यांनी म्हटले की, पूर्व अंदाजानुसार, खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या तमिळनाडुच्या 200 पेक्षा जास्त बोटींना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. शनिवारपासून दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीलगतच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

पुढील 24 तासात हा पट्टा मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याचा अंदाज आहे. तो पश्चिम-उत्तर पश्चिमकडे जाण्याची शक्यता आहे आणि 2 डिसेंबरला दक्षिण तामिळनाडुच्या किनार्‍यावर पोहचण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे तामिळनाडु, पुदुचेरी आणि करायकलमध्ये 3 डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि गर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

आयएमडीने ट्विट करून सांगितले की, केरळच्या इडुक्की जिल्ह्यात बुधवारसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे आणि मच्छिमारांना 30 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा जिल्ह्यांसाठी दोन डिसेंबरसाठी ऑरेंज अलर्ट आणि अलप्पुझा, कोट्टायम आण एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये याच दिवशी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, उत्तर भारतात यावेळी जास्त कडाक्याची थंडी पडू शकते. तसेच थंडीच्या लाटेची शक्यता आहे. हिवाळ्याच्या यापुर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात किमान तापमान समान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.