West Bengal Election : सर्व जागांचे कल आले, बंगालमध्ये पुन्हा ‘ममताराज’; पण…

कोलकाता : वृत्तसंस्था – सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जीं विरोधात मैदानात उतरले होते. राज्यात 294 जागांसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत 8 टप्प्यात मतदान घेण्यात आले. सत्ता स्थापनेसाठी 147 जागांची आवश्यकता आहे. ममता बॅनर्जी यांनी हॅट्रिक करणार की भाजप सत्ता खेचून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. तृणमूल काँग्रेसने 200 पुढे जागा मिळवत मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. मात्र, भाजपला 83 जागांवरच विजय मिळत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत झालेल्य मतमोजणीत भाजपला 37.3 टक्के मतं मिळाली आहेत. तर तृणमूल काँग्रेसला 48.4 टक्के मतं मिळाली आहेत. भाजप सध्या 83 जागांवर आघाडीवर आहे तृणमूल काँग्रेस 209 जागांवर आघाडीवर आहे.

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर
केवळ पश्चिम बंगालचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना भाजपचे सुवेंदू अधिकारी हे कडवी झुंज देत आहे. चौथ्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सात हजार मतांनी पिछाडीवर असून सुवेंदू आघाडीवर आहेत. एककीकडे राज्यात तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र ममता यांच्यावर पराभवाचे सावट आहे. दरम्यान ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर मोठा तंबू उभारण्यात आला असून त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.