मी शांत बसलीय हे तुमचं नशीब समजा, नाहीतर…; ममताांचा भाजपला थेट इशारा

कोलकाता : वृत्तसंस्था – भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाकयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी झालेल्या राड्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला धमकी दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली.

यावेळी तुमचं नशीब चांगलं आहे की, मी इथे शांत बसली आहे. अन्यथा एका सेकंदात दिल्लीतलं भाजपचं ऑफिस आणि तुमच्या घरांवर ताबा मिळवू शकते, असा धमकीवजा इशारा ममतांनी भाजपला दिला. अमित शहा काय देव आहेत का त्यांच्या विरोधात आंदोलन न करायला..? असाही सवाल त्यांनी विचारला. पश्चिम बंगालमध्ये १९ तारखेला मतदान होणार आहे या पार्शवभूमीवर भाजप आणि तृणमूल दोघांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे. यात शाब्दिक युद्धाबरोबरच हिंसाचार देखील मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला.

जाळपोळ आणि तोडफोड

दरम्यान, १४ तारखेला अमित शहा यांच्या रॅलीत भाजप कार्यकर्ते आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि याचे रूपांतर हिंसाचारात झाले. या हिंसाचारात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची देखील तोडफोड करण्यात आली, त्याचप्रमाणे वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे अमित शहा यांना रोड शो अर्ध्यातच सोडावा लागला.