TMC खासदाराने सर्वांसमोर खेचला महिला MLA चा गाल, BJP MP ने व्हिडिओ शेयर करून साधला निशाणा : व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशावेळी वक्तव्यांसह काही व्हिडिओंवरून नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. असेच एक प्रकरण पश्चिम बंगालमध्ये समोर आले आहे. बंगालमधील भाजपाच्या खासदार लॉकेट चटर्जी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेयर करून तृणमूल काँग्रेस आणि त्यांचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये टीएमसी खासदार सर्वांसमोर पत्रकार परिषदेत पक्षाच्या एका महिला आमदारांचा गाल खेचताना दिसत आहे.

हा व्हिडिओ कधीचा आहे, हे स्पष्ट नाही. परंतु लॉकेट चटर्जी यांचा दावा आहे की, यामध्ये दिसत असलेला व्यक्ती टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आहेत. लॉकेट चटर्जी यांनी ट्विटरवर लिहिले आहे, टीएमसी महिलांना सशक्त बनवत आहे, हे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि निवर्तमान बांकुरा महिला आमदार आहेत, ज्या तिकिट न मिळाल्याने नाराज होत्या. लाज वाटली पाहिजे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपा तृणमूल काँग्रेसबाबत आक्रमक झाली आहे. भाजपाने यासंबंधी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये महिलांसंबंधी गुन्हे उदाहरणार्थ बलात्कार, छेडछाडीसारख्या घटना मागील 10 वर्षात कमी झालेल्या नाहीत. इतकेच काय तर ममता सरकारने राज्यात होणार्‍या महिलांच्या बाबतीतील गुन्ह्यांचे आकडे सुद्धा एनसीआरबीला दिले नाही. यामुळे सविस्तर रिपोर्ट सुद्धा तयार करता आलेला नाही.

तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत यावेळी 50 महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नुकतेच कोलकातामध्ये मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी महिला सुरक्षा आणि महागाईवर रॅली सुद्धा काढली होती. यामध्ये मोठ्या संख्येने महिला दिसल्या होत्या.