“मतदानाच्या दिवशी करा फक्त ‘एवढंच’ काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा…! गडकरींचा ममतांवर हल्लाबोल

कोलकाता : वृत्तसंस्था – लवकरच पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षाकडून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. यादरम्यान आता भाजपचे केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितिन गडकरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला आहे. नितीन गडकरी एका रॅली दरम्यान बोलले कि, निवडणूक निकालाच्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना असा शॉक बसेल, की त्या आपल्या खुर्चीवरून दोन फूट वर उडतील.

पश्चिम बंगाल मध्ये जोयेपूर येथे भाजपकडून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला संबोधित करताना गडकरी म्हणाले, ”मतदानाच्या दिवशी सकाळी उठा, आपल्या कुल देवतेचे स्मरण करा. पोलिंग बूथवर जा आणि कमळाचे बटन दाबा. असा शॉक लागेल, की ममता बॅनर्जी आपल्या खुर्चीवरून दोन फूट वर उडतील. फक्त हा शॉक द्या, मग पाहा राज्यात विकासाचा बल्ब कसा पेटतो.”

तसेच गडकरी पुढे म्हणाले. ”2 मेरोजी परिवर्तन होईल. राज्यात कमळाचा विजय होईल. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. तीन मेरोजी आपल्या नेत्याची निवड होईल. 4 मेरोजी भाजपचे मुख्यमंत्री शपथ घेतील. आता याला कुणीही रोखू शकत नाही.”

”ही निवडणूक, भाजप, टीएमसी, काँग्रेस अथवा सीपीएमच्या भविष्यासाठी नाही. ही निवडणूक, पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, राहुल गांधी अथवा ममता बॅनर्जी यांच्या भविष्यासाठीही नाही. ही निवडणूक, बंगालमधील लोकांच्या भविष्यासाठी आहे. बंगालची प्रतिमा बदलण्याची आणि देशाला जगात महाशक्ती बनविण्याची आमची इच्छा आहे,” असे गडकरी जोयेपूर येथील रॅलीला संबोधित करताना म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा २७ मार्च रोजी तर शेवटचा टप्पा २९ एप्रिलला होणार आहे. तर २ मी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.