पं. बंगाल, केरळमध्ये पुन्हा सत्ताधार्‍यांना कल; पाँडेचरी, तामिळनाडुत सत्तांतराचा जनमत चाचणीत अंदाज

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर होणार असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, जनमताचा कानोसा घेतला तर तृणमूलच्या जागा घटल्या तरी सत्ता ममता बॅनर्जी यांच्याकडेच राहणार असल्याचा कल दिसून येत आहे. त्याचप्रमाणे केरळमध्येही सत्ताधारी पुन्हा सत्ता प्रस्थापित करु शकतील़ मात्र, पाँडेचरी आणि तामिळनाडुमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एबीपी -सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जनमत चाचणीनुसार, पश्चिम बंगालमधील २९४ जागांपैकी तृणमूल काँग्रेस १४८ ते १६४ जागा मिळवून पुन्हा सत्तेवर येईल. भाजपच्या वाट्याला ९२ ते १०८ जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना ३१ ते ३९ जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. त्यांनाच सत्ता मिळाली तरी त्यांच्या जागांमध्ये मोठी घट होण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे डावे आणि काँग्रेसच्या जागा घटण्याची शक्यता आहे.

या जनमत चाचणीनुसार आसाममध्ये भाजपचीच सत्ता येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आसाममधील १२६ जागांपैकी एनडीएला ६८ ते ७६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आघाडीला ४३ ते ५१ जागा मिळतील.

तामिळनाडुमध्ये एकूण २३४ जागांपैकी विरोधक डीएमके १५४ ते १६२ जागा मिळवून सत्ता स्थापन करेल, असा अंदाज आहे. सत्ताधारी एआयएडीएमके आघाडीला ५८ ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणुक आहे. त्यासाठी डीएमके चे नेते एम़ के़ स्टॅलीन यांनी काँग्रेससोबत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला मोठे यश मिळेल असा अंदाज आहे. केरळमध्ये पुन्हा सत्ताधार्‍यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी डाव्या आघाडीला १४० पैकी ८३ ते ९१ जागा मिळतील. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला ४७ ते ५५ जागा मिळतील. भाजपला मात्र केवळ २ जागा मिळतील.

पाँडेचरीमध्ये सत्ता परिवर्तन होण्याचा अंदाज आहे. तेथे ३० जागांपैकी एनडीएला १७ ते २१ जागा मिळतील. काँग्रेस आघाडीला ८ ते १२ जागा मिळण्याची शक्यता या जनमत चाचणीत व्यक्त करण्यात आली आहे.