कमलनाथ यांची जीभ घसरली, भाजपा महिला उमेदवारास म्हटले ‘आयटम’ ,व्हिडीओ व्हायरल

डबरा : वृत्तसंस्था – बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोट निवडणुकांचे वारे सुरु आहे. मध्य प्रदेशमधील पोट निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथने भाजपाच्या महिला उमेदवाराबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. त्यांनी केलेल्या विधानावरुन भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेशच्या डबरा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषणादरम्यान म्हटले की, सुरेंद्र राजेश आपले उमेदवार आहेत, साध्या-सरळ स्वभावाचे आहेत. हे तिच्या सारखे नाहीत ? काय तिचे नाव ? मी काय तिचे नाव घेऊ तुम्ही तर तिला माझ्या पेक्षाही चांगल्या प्रकारे ओळखतात, तुम्ही तर मला आगोदरच सावध करायला हवं होतं, ही काय आयटम आहे. इमरती देवी, त्या माजी आमदारांपैकी एक आहेत, ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे. इमरती देवी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानले जाते.

शिवराज सिंह भडकले
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, कमलनाथ जी, इमरतीदेवी त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे नाव आहे, ज्यांनी गावात मजुरी करण्यापासून सुरुवात केली व आज लोकप्रतिनिधीच्या रुपात राष्ट्र निर्माणात मदत करत आहेत. काँग्रेसने मला भूखा नंगा म्हटलं आणि एक महिलेसाठी आयटम सारख्या शब्दाचा वापर करुन आपली विचारसरणी दर्शवली.