‘रामभक्तांना भिकारी संबोधणे, हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व’, राम कदमांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी भाग घेणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिकारी म्हटले. हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व आहे, असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी ट्विटवरुन केली आहे.

राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राम मंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि राम भक्ताची मनापासून इच्छा आहे की, निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी, असे असताना देखील, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधणे ? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व ? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच याचे उत्तर राम भक्तांना भिकारी संबोधनारे अब्दुल सत्तार यांनी इतरांना भिकारी म्हणण्यापूर्वी द्यावे, असेही राम कदम यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ?
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपकडून निधी संकलन मोहीम राबवण्यात येत आहे. यावरुन शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात भाजपवर निशाणा साधला. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशुर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दात सत्तार यांनी भाजपला टोला लगावला होता.