पत्नीच्या डोळयासमोरच ‘तो’ पायलट झाला नाहीसा ; विमान एन-32 ‘गायब’ होते वेळी पत्नी नियंत्रण कक्षात ‘हजर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेचे बेपत्ता विमान एन-३२ चा शोध घेण्याची मोहीम चौथ्या दिवशीही सुरु आहे. विमानाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाईटचा वापर केला जातोय. विमानामध्ये २९ वर्षीय आशिष तंवर देखील होते. आशिष यांची पत्नी संध्या आसामच्या जोरहाट कंट्रोल रूममध्ये कर्तव्यावर होती. या ठिकाणावरूनच एन-३२ विमानाने दुपारी १२.२५ वाजता अरुणाचलप्रदेशच्या मेनचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले.

आशिषचे काका फ्लाईट लेफ्टनंट उदयविरसिंह म्हणाले की, विमानाशी १ वाजताच संपर्क तुटलेला होता आणि आशिषच्या पत्नीने म्हणजे संध्याने १ तासानंतर या घटनेची माहिती फोनवरून आम्हाला दिली.

विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक क्षणाला वैमानिकचा परिवार अधिक दुःखी होत चालला आहे. पलवलच्या हुड्डा सेक्टर मध्ये असणाऱ्या आशिषच्या काकाने म्हंटले की, सुरवातीला आम्हाला आशा होती की विमान चीनमध्ये जाऊन आपतकालीन लँडिंग होईल पण असं झालं असत तर त्यांनी आतापर्यंत आमच्याशी संपर्क साधला असता.  त्यांचे विमान डोंगरावरच दुर्घटना ग्रस्त झाले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील अधिकाऱ्यांना भेटायला आणि माहिती मिळवायला आसामला गेले आहेत. पण त्यांची आई घरीच आहे. ती पूर्णतः कोलमडून पडली आहे आणि न रडता एक शब्दही बोलायला ती तयार नाही. आशिषच्या वडिलांच्या सहा भावांपैकी पाच जण हवाई दलात आहेत. आशिषचे वडील राधेलाल सेनेतून निवृत्त झाले आहेत. परिवारामुळे प्रेरित होऊनच आशिष देशसेवेसाठी हवाई दलात दाखल झाले आहेत. त्यांची मोठी बहीण स्काॅड्रन लीडर आहे.