कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय? रुग्णालयात दाखल होण्याची घाई करताय? तर हा वाचा डॉक्टरांचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. पण अनेकदा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची घाई केली जाते. पण हे करणे आवश्यक होते, जेव्हा रुग्णाला जास्त प्रमाणात लक्षणे जाणवत असतील तर…मात्र, जास्त लक्षणे नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

देशातील विविध राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असताना या वाढत्या रुग्णसंख्येवरून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यामध्ये टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. सी. एस. प्रथमेश यांचा सल्ला सांगण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये चांगल्या आहारासोबतच, योग-प्राणायम करणे, कोरोनाबाधित रुग्णांनी ताप आणि ऑक्सिजन पातळी तपासत राहण्याचा सल्ला दिला आहे. जास्त लक्षणे नसलेल्या रुग्णांनी लगेच रुग्णालयात दाखल होऊ नये. तसेच जर रुग्णाची ऑक्सिजन पातळी ठीक आहे. तापाशिवाय इतर कोणतीही लक्षणे नाहीत. तर अशावेळी रुग्णांनी पॅरासिटामॉल घेऊन घरी आराम करावा.

तसेच तुमच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा जास्त असल्यास तुम्हाला भरती होण्याची गरज नाही. आणखी सविस्तर माहिती मिळवायची असल्यास, रुग्णाने आपल्या खोलीत 6 मिनिट चालावे. त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन चाचणी करावी. यानंतर तुमची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होत असेल तर तुम्ही रुग्णालयाशी संपर्क करावा, असेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.