दहशतवादी मेला तरी आम्हाला दु:ख होतं : जम्मू-कश्मीरचे राज्यपाल

श्रीनगर : वृत्तसंस्था – राज्यामध्ये एक जरी व्यक्ती ठार झाला, मग भलेही तो दहशतवादी का असेना आम्हाला त्रास होतो, असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. तसेच कश्मिरी तरुण हत्यार सोडून मुख्य प्रवाहात परत यावेत अशी आमची इच्छा असल्याचे मलिक म्हणाले.

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल जवानांचे अभिनंदन केले परंतु मारणे हाच कश्मीरमधील दहशतवाद संपवण्याचा उपाय नाही’ असेही ते म्हणाले. राज्यपाल मलिक पुढे म्हणाले की, कश्मीरमधील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हत्या हे दहशतवादमुक्तीचे समाधान नाही. दहशतवाद हा शस्त्रात नाही तर व्यक्तीच्या डोक्यात असतो.

बारामुल्ला जिल्ह्यावर फार दीर्घ काळापासून दहशतवादाचा प्रभाव होता. बारामुल्लातील सोपोर परिसरात यापूर्वीही कित्येकदा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या आहेत. ऑपरेशन ऑल आउटदरम्यानही भारतीय लष्कराने बारामुल्लातील वेगवेगळ्या गावांमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा ‘दहशवादमुक्त जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. परंतु जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जवानांचे खच्चीकरण करण्यासारखे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी  ऑगस्ट २०१८ पासून आहेत. यापूर्वी  बिहार, ओडिशा या राज्यांचं राज्यपालपदही त्यांनी सांभाळलं आहे.