एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे कोण ? ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून महाराष्ट्रात सुरूय ‘गोंधळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराट्रातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट इंस्पेक्टर सचिन वाझे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पुन्हा एकदा वाझे यांच्यावर पुरावे नष्ट करण्यासह ’सशंयीत खूना’त सहभागी असल्याचा आरोप आहे.आणि हे प्रकरणे त्या स्कॉर्पियो कारच्या मालकाशी जोडलेले आहे, जे भारतातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अ‍ॅन्टेलिया च्या बाहेर सापडलेल्या कारशी संबंधीत आहे.

कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. हिरेन यांनी आपली कार चोरी झाल्याचा तक्रार नोंदवली होती. दरम्यान, हिरेन यांच्या पत्नीचा आरोप आहे की, वाझे त्यांच्या पतीच्या खूनात सहभागी आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे नष्ट केल्या प्रकरणी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने विरोधकांचा दबाव वाढल्याने वाझे यांची बदली केली आहे.

कोण आहेत सचिन वाझे :

सचिन वाझे महाराष्ट्र पोलीसचे एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1972 मध्ये कोल्हापुरमध्ये झाला तसेच ते 1990 मध्ये पोलीस अधिकारी बनले. त्यांच्या पोलीस करियरची सुरुवात गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित परिसरातून झाली. नंतर त्यांची बदली ठाणे येथे झाली, येथे ते एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या टीममध्ये सहभागी झाले. 1992 ते 2004 पर्यंत त्यांनी 63 गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले.

2002 मध्ये बदलले जीवन :

मुंबईच्या घाटकोपर ब्लास्टशी संबंधीत प्रकरणाने सचिन वाझे यांचे जीवन बदलून टाकले. या हल्ल्यातील आरोपी ख्वाजा यूनुसला डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, परंतु ख्वाजाला औरंगाबादला घेऊन जात असताना तो पोलीसांच्या ताब्यातून फरार झाला. या घटनेची सीआयडी चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये खुलासा झाला की, ख्वाजाचा मृत्यू तर पोलीस कोठडीतच झाला होता. यानंतर वाझे यांना निलंबित करण्यात आले, नंतर 2004 मध्ये पुरावे नष्ट केल्याच्या आरोपात त्यांना अटक सुद्धा झाली.

राजकारणात प्रवेश :

2008 मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि यासोबतच तंत्रज्ञानावर त्यांची चांगली पकड असल्याने त्यांनी लालबिहारी नावाची नेटवर्किंग साइट सुद्धा सुरू केली. इतकेच नव्हे, सचिन वाझे यांनी लेखन सुद्धा केले. शीना बोरा हत्याकांड आणि डेव्हिड हेडलीवर त्यांनी पुस्तके सुद्धा लिहिली.

2020 मध्ये पुन्हा वर्दी परिधान केली :

2020 मध्ये पुन्हा एकदा सचिन वाझे यांना वर्दी मिळाली. वर्दी घालताच पुन्हा वाझे अ‍ॅक्शनमध्ये दिसले. अर्णब गोस्वामी प्रकरणात सुद्धा ते खुप चर्चेत होते. त्यांनी अर्णबला अटक केली, तसेच त्यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली.