सांगली : मेसेज पाठवल्याच्या कराणावरुन तरुणाचे अपहरण करणारे गजाआड

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मित्राच्या काकीला चुकून पाठवण्यात आलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली होती. ही घटना सोमवारी (दि.११) रात्री साडेनऊच्या सुमारास सांगलीमध्ये घडला होता. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने चारजणांना अटक केली आहे.

मुख्य सूत्रधार कपील सुनील शिंदे (वय २१, रा. शिकलगार गल्ली, सम्राट व्यायाम मंडळाजवळ, सांगली) त्याचे साथीदार किरण रुपेश भंडारे (वय २०, रा. रमामाता नगर, नुराणी मस्जिदजवळ, सांगली), रोहित उर्फ चिव्या बाळासाहेब कांबळे (वय २९, रा. गणेश नगर, गोंधळे प्लॉट, सांगली), स्वप्नील अनिल गुरव (वय २०, रा. पाकिजा मस्जिदजवळ, शंभर फूटी रोड, सांगली) यांचा समावेश आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन युवकाचाही सहभाग आहे.

संशयितांना अटक करुन त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांनी निखील राजू शिकलगार (वय १७, रा. सम्राट व्यायाम मंडळाजवळ, शिकलगार गल्ली, सांगली) याचे अपहरण करुन त्याला दगड आणि बांबूने बेदम मारहाण केली आहे. यामध्ये निखील हा जखमी झाला असून त्याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निखीलने याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण भंडारे, तबरीस तांबोळी, रोहित उर्फ चिव्या कांबळे, स्वप्नील गुरव, यांच्यासह चार अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील हा शिकलगार गल्लीत राहतो. सोमवार दि. ११ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास निखील हा येथील संजोग कॉलनीतील ज्ञानेश्वर कॉलनीतून जात होता. त्यावेळी कपील शिंदे हा तेथे आला. त्याने निखीलला मारहाण करत जबरीन दुचाकीवर बसवले. कपीलने निखीलला कत्तलखान्याजवळील लोंढे मळा येथे दुचाकी नेली. तेथे वरील संशयित आरोपी थांबले होते. त्यांनी निखीलला शिवीगाळ करुन मारहाण सुरु केली. कपिलच्या काकीला मोबाईलवर मेसेज का पाठवलास यावरुन निखीलला त्यांनी बेदम मारहाण केली. संशयितांनी निखीलला पाकिजा मस्जिद चौकात नेले. तेथून शामराव नगर येथील ५० फुटी रस्त्याकडे नेले. तेथेही त्याला मारहाण करण्यात आली.
हल्लेखोरांनी रात्रभर निखीलला ताब्यात ठेवले. त्याला रात्रभर मारहाण सुरु ठेवली. मंगळवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजता पुन्हा संशयितांनी निखीलला लोंढे मळ्यात आणले. तेथे असलेल्या शेतात त्याला नेवून त्याच्या डोक्यात दोन बाटल्या फोडत पुन्हा मारहाण केली. यामध्ये निखील हा जबर जखमी झाला आहे. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल होताच गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके व त्यांच्या पथकाने हालचाली गतिमान करुन जेरबंद केले.

ही कारवाइ गुंडाविरोधी पथकाचे संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सचिन कुंभर संतोष गळवे, संकेत कानडे, वैभव पाटील, सागर लवटे, प्रफुल्ल सुर्वे, मोतीराम खोत, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांनी ही कारवाई केली.