अजुन किती दिवस भारताचं दारिद्र्य ऑस्करमध्ये विकायचं ?

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बॉलिवुडमध्ये सध्या भारतातील राजकाराणावर आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘ द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात मनमोहनसिंगांची भूमिका साकारलेले अनुपम खेर यांनी हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आपण किती वर्ष ऑस्करच्या शर्यतीत फक्त भारताचं दारिद्र्य विकत राहणार आहोत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट आजच्या भारतातील राजकारणावर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट ऑस्करसाठी जरूर पाठवला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

किती काळ आपण भारतातील दारिद्र्य, दोन वर्गातील तफावत यांच्यावर आधारलेले चित्रपट विकणार आहोत? किती काळ आपण हत्ती, माकडांवर आधारलेले चित्रपट विकणार आहोत? आपण आता वेगळ्या विषयांवर चित्रपट ऑस्करसाठी पाठवायला सुरुवात केली पाहिजे आणि हा चित्रपट तसाच आहे, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, अनुपम खेर यांची पत्नी आणि भाजपच्या खासदार किरण खेर यांनीही हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा चित्रपट पाहुन प्रक्षेक मनमोहन सिंग यांच्या प्रेमात पडतील, असं त्यांनी म्हटलं होतं.