डॉ. कफील खान यांचं भाषण ’देशद्रोही’ नव्हते, उच्च न्यायालयाची योगी सरकारला जोरदार ‘चपराक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ. कफील खान यांचं भाषण हे देशद्रोही नव्हतं, असं म्हणत न्यायालयाने उत्तर प्रदेश राज्याच्या योगी सरकारला चांगलीच चपराक लगावली आहे. तसेच याबाबत न्यायालयाने अनेक बाबी नमूद केल्या आहेत.

मुख्य न्यायमूर्ती गोविंद माथुर व न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंह यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशा राज्यात रासुका/राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेल्या डॉ. कफील खान यांच्या ताबडतोब सुटकेचे आदेश दिले आहेत. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. कफील खान यांच्यावरचा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली दाखल केलेले गुन्हेही रद्द करण्याचे आदेश देखील दिले आहेत. सोबतच डॉ. कफील खान यांना अटक करण्यात आली ते भाषण कोणत्याही अर्थाने द्वेष निर्माण करणारं किंवा दंगल घडवून आणणारं नाही. डॉ. कफील खान यांच्या भाषणामुळे अलीगडमध्ये शांती व्यवस्थेला कोणताही धोका नाही, असंही उच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. एवढंच नव्हे तर, डॉ. कफील खान यांचं भाषण सरकारच्या नीतीधोरणाचा विरोध करणारं होतं, मात्र ते हिंसेला प्रोत्साहन देणारं किंवा हिंसा उत्पन्न करणारं नव्हतं. वास्तविकता: डॉ. कफील खान यांच्या भाषणात देशाच्या अखंडतेचा व एकतेचा सूर आहे’, असं देखील उच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. उच्च न्यायालयाचा हा सूर उत्तर प्रदेश राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारसाठी एक मोठी चपराक मानली जात आहे.

डॉ. कफील खान यांच्यावर रासुका अंतर्गत केलेली कारवाई चुकीची : उच्च न्यायालय
डॉ. कफील खान यांना रासुका कायद्याखाली तुरुंगात टाकण्याची केलेली कारवाई देखील चुकीची आहे, असेही उच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. कथितरित्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात 13 डिसेंबर 2013 रोजी अलीगड मुस्लीम विद्यापीठामध्ये एक चिथावणीखोर भाषण देण्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश राज्याच्या स्पेशल टास्क फोर्सने डॉ. कफील खान यांना जानेवारी महिन्यामध्ये मुंबई येथून अटक केली होती. सध्या ते मथुरा तुरुंगामध्ये बंद आहेत. त्यांच्या कैदेत तीन वेळा रासुका कायद्याखाली वाढ केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार, शांतीव्यवस्था भंग करण्यासाठी सरकारने कुणाला जबाबदार धरलं?, तर 12 महिन्यांपर्यंत त्यांना कैदेत ठेवता येण्याचा अधिकारला सरकारला बहाल करण्यात आला आहे.

खंडपीठाने डॉ. कफील खान बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवर हा निर्णय दिला आहे. 11 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला डॉ. कफील खान यांच्या आईच्या अर्जावर 15 दिवसांमध्ये निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यापूर्वी डॉ. कफील खान यांच्या पत्नीने ट्विटर आपल्या पतीच्या सुटकेसाठी 4 ऑगस्ट रोजी एक मोहीमही सुरू केली होती. या मोहिमेला अनेकांकडून समर्थनही मिळालं होतं. अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. कफील खान यांच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतर ’एका निर्दोष व्यक्तीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून तुरुंगामध्ये टाकून सात महिने त्याचा छळ केला. जर तुमच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारखी शक्ती असेल तर त्याचा गैरवापर करू नका’ अशी प्रतिक्रिया डॉ. कफील खान यांची पत्नी शबिस्ता खान यांनी व्यक्त केलीय.

2017 मध्ये डॉ. कफील खान ठरले होते ’रिअल हिरो’
रासुका अंतर्गत अटकेपूर्वी गोरखपूर दुर्घटनेतही डॉ. कफील खान यांना अटक केली होती. ऑगस्ट 2017 मध्ये गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये ऑक्सिजनअभावी सुमारे 70 मुलांचा मृत्यू झाला होता. यावेळी मुलांना वाचवण्यासाठी पदरचे पैसै खर्चून ऑक्सिजन सिलिंडर्स आणल्यामुळे डॉ. कफील खान चर्चेत आले होते. ’अन्य डॉक्टरांनी आशा सोडली होती, तेव्हा डॉ. कफील खान यांनी ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले’ असंही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. डॉ. कफील खान हे मेंदुज्वर विभागाचे नोडल ऑफिसर होते. त्यांच्यामुळे अनेक बालकांचे प्राण वाचवणं शक्य झाले होते.

गोरखपूर दुर्घटनेतही डॉ. कफील खान यांच्यावर चुकीचा ठपका
डॉ. कफील खान यांच्यावर ’सरकारी सेवेत असतानाही खासगी क्लिनिक चालवत असल्याचा आरोप करत त्यांना ’विभागप्रमुख’ पदावरून हटविले होते. तसेच या गोरखपूर दुर्घटनेत निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन डॉ. कफिल खान यांना अटक देखील केली होती. आठ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर न्यायालयाने डॉ. कफील खान यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा कोणताच पुरावा आढळला नाही, असे सांगत त्यांना जामीन मंजूर केला होता. ’डॉ. कफील खान हे वैद्यकीय सेवा करणारे आहेत. ते सरकारी नोकरदार असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही,’ असं देखील न्यायालयानं नमूद केलं होतं. तर ’माझ्याविरोधात खोटा प्रचार सुरू आहे. मी जे केलं ते केवळ मुलांची मदत करण्याच्या उद्देशाने केलंय’ असं स्पष्टीकरण डॉ. कफील खान यांनी म्हटलं होतं.

’उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिसांवर विश्वास नाही’ – डॉ. कफील खान
उत्तर प्रदेश राज्याच्या स्पेशल टास्क फोर्सने डॉ. कफील खान यांना द्वेष पसरवणारे भाषण केल्यामुळे अटक केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात खटला दाखल केला. यावेळी ’मला गोरखपूरच्या मुलांच्या मृत्यूप्रकरणी क्लीन चिट दिली होती. आता मला पुन्हा आरोपी बनवण्याचा प्रयत्न होत आहे. मला महाराष्ट्र राज्यातच याहू द्या, अशी विनंती मी महाराष्ट्र सरकारला करत आहे. मला उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिसांवर विश्वास नाही’,असे म्हणत डॉ. कफील खान यांनी मदतीची मागणी केली होती.