…आणि साथ सुटली ! एक्सप्रेस हायवेवरील भीषण अपघातात पती ठार पत्नी गंभीर जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील जोगेश्वरी फ्लायओव्हर वर भरधाव येणाऱ्या ट्रकने एका स्कुटरला जोराची धडक दिली या घटनेत स्कुटरवरील पतीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. विश्वास मध्यालकर असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मध्यालकर पती – पत्नी जोगेश्वरी फ्लायओव्हरवर वरून जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्कुटरला मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या धडकेनंतर विश्वास यांची पत्नी स्कुटरवरून दूरवर फेकल्या गेल्या. तर विश्वास यांना ट्रकने जवळपास २० फूट लांब फरफटत नेले. या अपघातात विश्वास यांचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती देखील गंभीर आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ट्रक ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील मोठी वाहतूक कोंडी झाली होती.