राजीनामा देणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पक्ष जी भूमिका घेईल ती मला मान्य असेल. जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. सध्यातरी स्वतःहून राजीनामा देणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले की, ‘सुजय यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची त्यांची मानसिकता नव्हती. म्हणून नाइलाजास्तव हा निर्णय घेतला आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या निर्णयाची माझा संबंध नाही.’

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे वडील डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून सुरू आहे. मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.