उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का ? : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाच्या वेळी सरकार मध्ये असूनही अंगणवाडी कर्मचा-यांना साथ देणारे शिवसेना कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे आता राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का ? असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला असून एस.टी. कर्मचा-यांच्या संपावर तातडीने तोडगा काढण्याची तसेच अन्यायकारक दरवाढ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात सुरू असलेला एस.टी. कर्मचारी यांचा संप व महामंडळाने नुकतीच केलेली 18 % दरवाढ याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस च्या पाठोपाठ एसटीच्या तिकीट दरवाढी मुळे आधीच त्रस्त सामान्य जनतेचे राज्यात सुरू असलेल्या एस.टी. कर्मचा-यांच्या संपामुळे हाल होत आहेत. एकीकडे कर्मचा-यांना पगारवाढ दिल्याचे कारण दाखऊन तिकिटांची दरवाढ करायची , दुसरी कडे कर्मचारी यांना ही समाधानकारक पगारवाढ न देऊन त्यांचीही फसवणूक करायची असा सरकारचा दुहेरी फसवणुकीचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात सुरू असलेल्या एस. टी. कर्मचा-यांच्या संपाबाबत, व कर्मचा-यांच्या न्याय मागण्यांबाबत सरकारने तातडीने तोडगा काढला पाहिजे. तसेच अन्यायकारक दरवाढ मागे घेऊन जनतेला आणि कर्मचारी यांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.