धक्कादायक ! ‘अँब्युलन्स’ न मिळाल्याने महिलेनं दुचाकीवरच दिला बाळाला ‘जन्म’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अँब्युलन्स न मिळाल्याने एका महिलेने दुचाकीवरच बाळाला जन्म दिल्याची घटना उत्तरप्रदेशातील चित्रकूटमध्ये घडली आहे. चित्रकूटमधील कलवार बुजुर्ग या गावात हि घटना घडली. मंगळवारी या गर्भवती महिलेला दुचाकीवरून दवाखान्यात दाखल करण्यात येत होते, मात्र रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला.

सार्वजनिक आरोग्य केंद्रातील प्रभारी डॉक्टर डॉ. ध्रुव कुमार यांनी या घटनेविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि, मंगळवारी दुपारी कलवार बुजुर्ग गावातील रहिवासी कुशल विश्वकर्मा यांच्या पत्नी लवली यांना प्रसूती कळा जाणवू लागल्यानंतर नातेवाईकांनी १०२ आणि १०८ या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्यानंतर दोन तास उलटून गेल्यानंतर देखील गावात अँब्युलन्स पोहोचली नाही. अखेर त्यांना दुचाकीवर दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दवाखान्यापासून ४० मीटर लांबीवर या महिलेने बाळाला जन्म दिला. या घटनेनंतर बाळाला आणि महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून आता दोघींचीही प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, गर्भवती महिलेने दिलेल्या माहितीनुसार चालत्या दुचाकीवर तिने बाळाला जन्म दिल्यानंतर तिने पाठीमागे बसलेल्या आपल्या सासूला याविषयी कल्पना दिली. गाडी थांबताच ती महिला आणि बाळ दोन्हीही खाली पडल्याने त्यांना थोड्या इजा झाल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त