महिलेने मरण्यापूर्वी राम मंदिरासाठी दान केले तब्बल 7 लाखांचे दागिने

जोधपूर : वृत्तसंस्था – आयोध्या येथे राम मंदिर निर्मितीसाठी देशभरातून निधी गोळा केला जात आहे. आत्तापर्यंत अनेक लोक, संस्थांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. पण एका महिलेने मरण्यापूर्वी तब्बल 7 लाखांचे दागिने दान केल्याने याचीच चर्चा आता सुरु आहे.

आशा असे त्या महिलेचे नाव आहे. त्या जोधपूर येथील रहिवासी होत्या. आशा यांनी मृत्यूपूर्वी राम मंदिरासाठी सर्व दागिने दान केले. त्यांची अंतिम इच्छा होती, की मृत्यूपूर्वी दागिने दान केले जावे आणि या दागिन्यांचा वापर राम मंदिरासाठी व्हावा. त्यानुसार, जोधपूर येथे समर्पण निधी जमवण्यासाठी प्रांत प्रचारक हेमंत यांच्याकडे 4 फेब्रुवारीला एक फोन आला आणि त्यामध्ये सांगितले, की विजयसिंह बोलतोय. माझी पत्नी आशा, राम मंदिरासाठी दागिने द्यायचा विचार करत होती. पण सध्या ती या जगात नाही. हे बोलताना विजयसिंह भावूक झाले होते. ते म्हणाले, ‘तुम्ही या आणि तिच्या अंत्यसंस्कारापूर्वी दागिने घेऊन जा. तिच्याकडचे सर्व दागिने भगवान श्रीरामला दान म्हणून असतील’.

या फोननंतर हेमंत यांना समजले की आशा यांची ही शेवटची इच्छा होती. त्यामुळे ते सुन्न झाले. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना अंत्यविधी करण्याचे सांगितले आणि आम्ही आशा यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी येऊ, असे आश्वासन दिले.

1 फेब्रुवारीला मदतीचे वक्तव्य
आशा यांनी 1 फेब्रुवारीला पती विजय आणि मुलगा मनोहर याच्याकडे राम मंदिर निर्मितीसाठी सर्व दागिने देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मुलगा मनोहरने आईची इच्छा मानत दागिने कसे देता येईल याची माहिती घेतो, असे सांगितले. पण जेव्हा माहिती घेतली तेव्हा समजले, की नियमानुसार दागिने दान म्हणून देता येऊ शकत नाही.

सोने विकून जमा केला निधी
आशा यांच्या कुटुंबियांना जेव्हा समजले, की राम मंदिरासाठी दागिने घेतले जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी 15 तोळे सोने आणि 23 ग्रॅम चांदी विकली. या विक्रीतून त्यांना 7,08,521 रुपये मिळाले. ही सर्व रक्कम राम मंदिर बांधणीसाठी देऊ केली. तसेच विजय यांनी राम नामची लिहिलेली चिठ्ठीही दान केली.