8 वर्षापासून मराठी महिलेचा रेल्वेत शारीरिक छळ, रेल्वे पोलिसांनी अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम रेल्वेमध्ये सिग्नल विभागात कार्यरत असणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचा शारीरिक छळ करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला अधिकारी महिलेला मागील आठ वर्षापासून छळत होता. अनेक वेळा या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र, कारवाई करण्याऐवजी महिलेची बदली करण्यात आली. बदली केल्यानंतर देखील तिचा छळ सुरु होता. अखेर महिलेने लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांवर देखील दबाव टाण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याला बळी न पडता पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.

वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड येथे सिग्नल विभागात कंट्रोल टॉवरवर काम करते. यादरम्यान तिचे वरिष्ठ अधिकारी राजीव कुमार मंडळ यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटली. त्यानंतर आणखी एका अधिकाऱ्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. राजीव याने आधीही तिला व्हॉट्सअॅपवर अश्लिल चॅट करुन त्रास दिला होता.

पीडित महिला सिग्नल दुरुस्तीसाठी जाताना तो तिच्याबाबत अश्लिल बोलायचा. तिच्यावर घाणेरड्या कमेंट दोघे करत होते. नोकरी जाण्याच्या भीतीमुळे तिने हा त्रास सहन केला. याबाबत तिने तक्रार केली मात्र आरोपींवर काहीच कारवाई झाली नाही, असे पीडित महिलेने सांगितले. उलट तिचीच बदली झाल्याने नोकरी जाईल या भीतीपोटी ती सर्व सहन करत होती. जवळपास 8 वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मराठी असल्याच्या रागातून हा छळ केला जात होता असाही आरोप तिने केला आहे.

अखेर रोजच्या छळाला कंटाळून तिने राजीव कुमार याच्या विरोधात वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विरनाथ माने यांनी कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना गुन्हा दाखल करु नये म्हणून अनेक फोन आले. मात्र कोणालाही न जुमानता कारवाई करण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजीव कुमार विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.