धक्कादायक ! 20 महिने पगार न मिळाल्याने ‘त्या’ कामगाराची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच.ए) कंपनीतील कामगारांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. येथील कामगारांकडून अनेक महिने थकलेल्या वेतनाची मागणी होत आहे. हे असतानाच धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या वीस महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे एका कामगाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास थेरगाव- मंगलनगर येथे घडली.

रामदास शिवाजीराव उकिरडे (५१, रा. मंगलनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उकिरडे हे पिंपरी येथील एच. ए कंपनीतील लॅबमध्ये काम करीत होते. त्यांचा पगार काही महिन्यांपासून रखडला असल्याने ते नैराश्यात होते. घरसंसाराला हातभार लावण्यासाठी त्यांच्या पत्नीने घराजवळच ब्युटी पार्लरचे दुकान देखील सुरु केले होते. मात्र, तरी देखील त्यांच्या मनावरील ताण हलका होत नव्हता. उकिरडे आपल्या मुलांजवळ पगाराबाबत सारखे चर्चा करीत होते. त्यांच्या मुलांनी त्यांना हा वाईट काळ निघून जाईल असे सांगून समजावले होते. तरी देखील ते कायम चिंताक्रांत होते. अखेर त्यांनी शुक्रवारी घरात एकटे असताना साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे कामगार कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading...
You might also like