शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी लढवली भलतीच शक्कल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा अशी सर्व पालकांची इच्छा असते. सध्याची परिस्थिती पाहता शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण बाब झाली आहे. म्हणूनच एका तरुणाने भलतीच शक्कल लढवली आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील नामांकित बिशप शाळेमध्ये दोन मुलांना प्रवेश मिळावा.यासाठी पुण्यातील एका तरुणाने इंटरनेटवरून पीएमओ कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाची राजमुद्रा असलेले लेटर पॅड तयार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात संबंधित तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. प्रणव भिकू इदाते (वय 21, सोमवार पेठ, पुणे) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रणव इदाते यांच्या ओळखीच्या काही व्यक्तीच्या मुलांना पूर्वप्राथमिक आणि तिसरीमध्ये बिशप शाळेत प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश मिळणे कठीण असल्याने प्रणवने इंटरनेटवरून पीएमओ कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाचे राजमुद्रा असलेले लेटर पॅड तयार केले. त्यावरून शिफारस पत्र देखील तयार केले. या पत्रामुळे तातडीने मुलांना प्रवेश मिळेल.असे त्याला वाटले. त्याच दरम्यान बिशप शाळेच्या प्राचार्य शेन मेकफरसन यांना याचा संशय आल्याने त्यांना पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयातील सामाजिक तपास पथकाने पुण्यात येऊन चौकशी केली. त्या चौकशीतून ते पत्र बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी प्रणव भिकू इदाते याला अटक केल्यावर त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.