…तशी अवस्था तृणमूलच्या गुंडांची होईल ; योगी आदित्यनाथांचा इशारा

कोलकाता : वृत्तसंस्था – केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद शिगेला पोहोचले आहे. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील सभेला बंदी होती. त्यांच्या या बंदीला झुंगारून आज पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे सभा घेतली आहे.

सभेला येण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर झारखंडमधील बोकोरो येथे उतरवण्यात आले. तिथून योगी यांनी कारने प्रवास करत पुरुलियात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी तेथील उपस्थितांना संबोधित केले. तसंच ममता बॅनर्जींवरही निशाना साधला. ममतांचं सरकार अराजक माजवणारं, लोकशाही आणि घटनाविरोधी आहे, असा आरोप योगी यांनी ममता बॅनर्जींवर केला.

पूर्वी, योगींनी आधी उत्तर प्रदेश व्यवस्थित सांभाळावे, असा सल्ला ममतांनी त्यांना दिला होता. या सल्ल्याचा योगींनी यावेळी समाचार घेताला. उत्तर प्रदेशचा कारभार आम्ही उत्तमपणे हाकत आहोत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे आज सपा-बसपाचे गुंड गळ्यात पाट्या लटकवून दयेची याचना करत फिरत आहेत, तशीच अवस्था येथे तृणमूलच्या गुंडांची होईल, असा इशारा योगींनी यावेळी दिला.

दरम्यान, योगींच्या हेलीकॉप्टरवर बंदी घालण्यात आली. तर त्यांनी कारने प्रवास करून सभा घेतली. तेव्हा त्यांनी माझ्यासारख्या संन्यासाला पश्चिम बंगालच्या भूमित येण्यापासून का रोखले गेले?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.