सातारा माहावितरण कार्यालयात तरुण अभियंत्याची आत्महत्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील महावितरण (Mahadiscom) कार्यालयामध्ये एका तरुण अभियंत्याने (Engineer) गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कार्यालयात खळबळ उडाली आहे. ही घटना कोरेगाव तालुक्यातील किन्हई गावात आज (रविवार) सकाळी घडली आहे.

सुरज देसाई असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ते महावितरण कंपनी (Msedcl) अभियंता म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते आज आपल्या कार्यालयात आले होते. पण काही वेळांनी देसाई यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कार्यालयातच त्यांनी आत्महत्या केल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरज देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करुन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. सुरज देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.