Facebook वरील मैत्री महागात, सोलापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, दोघांना अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  फेसबुकवर झालेली मैत्री एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. मित्राने फिक्चर दाखवण्याचे अमिष दाखवून मुलीला एका घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसापूर्वी सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीने तक्रार दिल्यानंतर आरोपीसह त्याला मदत करणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.

साकीब शाकारी कुरेशी (वय 20) व विनय कुलकर्णी (वय 45) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका अल्पवयीन मुलीला आरोपी साकीबने फेसबूकवरुन फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठवली होती. त्या मुलीने ती रिक्‍वेस्ट ऍक्‍सेप्ट केली. दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले अन् त्याचे रुपांतर ओळखीत झाले. ओळख वाढू लागल्यानंतर दोघांनी भेटायला सुरु केले. चहासह अन्य कारणानिमित्ताने त्यांच्या भेटीगाठी सुरुच होत्या. परंतु, 4 जानेवारीला साकीबने त्या मुलीला पिक्‍चर पाहण्याचे अमिष दाखवून दुचाकीवर बसविले आणि जुळे सोलापुरातील एका घरात नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर मुलीने आई- वडिलांसह पोलिस ठाणे गाठले आणि विजापूर नाका पोलिसांत साकीब आणि त्याला मदत करणाऱ्या विनय कुलकर्णी (वय 45) यांच्याविरुध्द तक्रार दिली. संशयित आरोपींविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रिती टिपरे करत आहेत.