तरुणाला शिवीगाळ करत लगावली कानशिलात, लाथ उगारणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

परभणी : ऑनलाइन टीम – परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची स्थानिक प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अनावश्यक कारणांनी बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, सध्या शेतीकामाचीही लगबग सुरू आहे. त्यासाठी बी-बीयाणे खरेदीसाठी गावागावात लगबग सुरु झाली आहे. अशाच शेतीकामाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला, पोलिसांनी बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जिंतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांचा हा व्हिडीओ आहे. अर्जुन पवार यांनी एका तरुणाला शिवीगाळ करत जोरात कानशीलात लगावली. जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार हे शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका तरुणाला थांबवून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाण झालेला तरुण हा गावाकडून शेतीचं साहित्य खरेदीसाठी आला होता. त्याला थांबवून अर्जुन पवार यांनी मारहाण केली. मात्र, शेतीकामाची कोणतीही कामं-दुकानं बंद नाहीत. असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही अशी अमानुष मारहाण का असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.या घटनेनंतर नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.

प्रभारी उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी रागाच्या भरात अर्जुन पवार यांनी त्या तरुणाला मारहाण केली. मात्र अशा पद्धतीने मारहाण करणे हे खेदजनकच आहे. याबद्दल आम्ही चौकशी करुन कायदेशीर कारवाई करु, असे दडस यांनी सांगितले.