पुण्यात डोंगरावरून उडी मारून युवकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – सिंहगड रस्ता भागातील धायरी गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावरून उडी मारून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

धायरी भागातील काही हौशी छायाचित्रकार तरुण गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावर रविवारी दुपारी गेले होते. डोंगराच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याने तरुणांना संशय आला. त्यांनी या भागाची पाहणी केली, तेव्हा काही अंतरावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

हा भाग निर्जन आहे. तरुणांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. डोंगरावरुन युवकाने उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघड झाले. आत्महत्या करणाऱ्या युवकाचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष दरम्यान आहे. त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सिंहगड रस्ता भागातून बेपत्ता झालेल्या युवकांची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मृतदेह कुजलेला असल्याने ओळख पटविण्यात अडचण येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

धक्कादायक… भावजई सोबत लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या