दुर्देवी ! मुंबईतील ट्रेकरचा राजगडावरील दरीत पडून मृत्यू

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – राजगडावर ट्रेकींगसाठी आलेल्या मुंबईतील तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. रविवारी (दि. 14) सकाळी ही घटना घडली. अनुराग अनिल राक्षे (वय 20, रा. भायखळा, मुंबई) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 16 जणांचा ग्रुप रविवारी (दि. 14) राजगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. त्यावेळी पद्मावती माचीजवळ फोटो काढताना अनुरागच्या वॉकी-टॉकीची बॅटरी खाली दरीत पडली. ती बॅटरी काढण्यासाठी खाली उतरताना त्याचा पाय घसरून तो खोल दरीत पडला. त्यानंतर ग्रुपमधील मित्रांनी 100 नंबरवर कॉल करून घडलेल्या अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरीत पडलेल्या तरुणाला बाहेर काढले. यावेळी वेल्हेचे पोलिस हवालदार औंदुबर अडवाल, अभय साळुंके, पोलिस पाटील बाळासाहेब रसाळ, पोलिस मित्र विकास घोरपडे, बाळू पवार आणि स्थानिकांनी तरुणाला किल्ल्याच्या पायथ्याशी गुंजवणे गावात आणले. त्यांतर करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलिस करत आहे.