जुन्या वादातून तरुणाचे तलवारीने कापले मुंडके

मच्छे (बेळगाव) : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या वादातून मित्राचे शीर धडावेगळे करुन खून केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवारी) संतीबस्तवाड येथे उघडकीस आली. विश्‍वनाथ यल्लाप्पा बिरमुत्ती (वय २२ रा. दरवेशी गल्ली, संतिबस्तवाड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्वनाथ याला पार्टीसाठी नेऊन त्याचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत ऊर्फ अज्जीपरशा बाबू निडगलकर, दुर्गेश मल्लाप्पा बिडकनट्टी, बाबूराव बसाप्पा बागेवाडी, रवी दुर्गाप्पा जिटीमणी, राजू मल्लाप्पा जिटीमणी, गुरू कोलकार, सुरेश तिप्पाण्णा गुडली (सर्वजण रा. संतीबस्तवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

संतबिस्तवाड येथील काही तरुणांनी गांधीनगर-तिर्थकुंडये रस्त्याच्या कडेला पार्टीचा बेत आखला. पार्टीमध्ये मित्रांनी रात्री १२ पर्यंत मद्यप्राशन केले. पार्टी सुरू असताना एकाने जुन्या भांडणाचा विषय उकरुन काढत विश्वनाथ याच्याबरोबर वाद घालू लागला. दोन वर्षांपूर्वी एका प्रकरणाचा उल्लेख निघाल्याने भांडण वाढत गेले. यावेळी विश्‍वनाथ बिरमुत्ती हा दगड घेण्यासाठी खाली वाकला तेव्हा मित्राच्या घोळक्यातील एकाने विश्‍वनाथच्या मानेवर धारदार तलवारीने वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की विश्‍वनाथचे शीर धडावेगळे झाले व तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. याठिकाणी अंधार असल्याने कोणाला काहीच समजेनासे झाले. परंतु, विश्‍वनाथ मृत पावला आहे, हे लक्षात येताच सर्वजण तेथून पळून गेले.

आज सकाळी गावातील काही शेतकरी शेताकडे जात होते. त्यावेळी त्यांना शीर नसलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती गावातील लोकांना दिली. मृतदेह पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. यावेळी हा मृतदेह माजी जिल्हा पंचायत सदस्य कै. यल्लाप्पा बिरमुत्ती यांच्या मुलाचा असल्याचे समजताच नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बालचंद्र बी. एस., पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली तलवार मृतदेहाजवळच आढळून आली. आरोपीने तलवार घटनास्थळी टाकून तेथून पळून गेला. पोलिसांनी तलवार जप्त केली असून हा खून पूर्व नियोजीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या गुन्ह्यामध्ये पार्टीला असलेल्या तरुणांपैकी काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.

गॅस गिझरमुळे बाथरूममध्ये गुदमरून सख्ख्या भावांचा मृत्यू