जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम : हर्षवर्धन पाटील

बाभुळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) –  जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जा हा उत्तम आहे. तसेच जि.प. शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत चालली असल्याने सध्याच्या स्पर्धेच्या युगात ही बाब कौतुकास्पद असल्याबाबतचे गौरवोद्गार राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गलांडवाडी नं.२ येथे काढले.

गलांडवाडी नं.२, ता. इंदापूर येथिल जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन बुधवारी दिनांक ४ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाले. यावेळी या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वेळीच योग्य वाव मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी स्नेहसंमेलने उपयुक्त ठरत आहेत, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची गीते सादर केली. तसेच स्वच्छतेची सवय, स्त्री-भ्रूण हत्या, राष्ट्रीय अस्मिता, सामाजिक व धार्मिक एकता, बेटी बचाओ- बेटी पढाओचे सादरीकरण केले. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, इंदापूर पं.स.सभापती पुष्पाताई रेडके, नगरसेवक कैलास कदम, सरपंच आशाताई गलांडे, गोपीचंद गलांडे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, ग्रामसेवक शहाजी कोकाटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक उमाकांत हिरे आभार यांनी मानले.