तुम्ही झोमॅटो वापरता ? तुमच्यासोबतही हे घडू शकतं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपण अनेकदा घरचं किंवा हाॅस्टेलवर राहत असाल तर मेसचं जेवण खाऊन कंटाळा येतो म्हणून बाहेर जेवायला जायचा प्लॅन करतो. कधी कधी आपण आॅनलाईन आॅर्डर करून पण फूड मागवत असतो. यामध्येही वेगवेगळी अॅप्लिकेशन्स आणि कंपन्यांमध्ये चुरस सुरु असलेली दिसते.

सध्या घरबसल्या अनेक गोष्टी मागवता येतात. जसं लोक आॅनलाईन शाॅपिंग करतात तसेच जेवण ही आॅनलाईन किंवा अॅपच्या माध्यमातून आॅर्डर करतात. परंतु आपण मागवलेल्या एखाद्या पदार्थाची डिलिव्हरी देणाऱ्या मुलाने त्या ऑर्डरमधील पदार्थ खाल्ल्याचे तुम्ही कधी ऐकलंय? तुम्हाला वाचून धक्का बसेल की, झोमॅटो या प्रसिद्ध कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने हा प्रकार केला आहे. झोमॅटो ही पदार्थ ऑर्डर करण्यासाठी सध्या सर्वाधिक लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीनेच असा धक्का दिल्याचे समोर आले आहे.

सध्या एक व्हिडीआे ट्वीटरवर चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसत आहे. ज्यात झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पार्सलमधील पदार्थ काढून खाल्ल्याची घटना घडली आहे. हा व्हिडीआे ट्विटरवर अपलोड करण्यात आल्यानंतर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीआेत एक व्यक्ती फॉईल पेपरच्या बॉक्समधील पदार्थ खात असल्याचे दिसत आहे. व्हिडियोमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा व्यक्ती झोमॅटोचा टीशर्ट घालून आणि झोमॅटोची बॅग घेऊन स्कूटरवर बसला आहे. बॉक्समधील पदार्थ खाल्ल्यानंतर हा बॉक्स होता त्याचप्रमाणे नीट लावून तो ठेऊन देतो आणि आणखी एक बॉक्स काढून पुन्हा त्यातील पदार्थ खायला सुरुवात करतो. मग त्यातलेही चार घास खातो आणि तो बॉक्सही ठेऊन देतो असे स्पष्ट दिसत  आहे. महत्त्वाचे म्हणजे सोशल मिडियावर अगदी कमी वेळात हा व्हिडियो व्हायरल झाला असून त्याबाबत बरीच चर्चाही रंगल्याचे चित्र आहे.
दरम्यान या घटनेनंतर हा व्हिडियो सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी शेअर आणि रिट्विट केला असून झोमॅटोच्या सर्व्हीसबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान कंपनीला ही घटना समजल्यानंतर कंपनीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारची घटना हे दुर्दैव आहे. ही गोष्ट आम्ही गांभीर्याने घेत असून यापुढे आम्ही टेंपरप्रूफ टेपचा वापर करु असे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच इतरही गोष्टींची काळजी कंपनीकडून घेतली जाईल असे कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे.