पॉक्सो तक्रारीमध्ये पीडित मुलांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावणे कायद्याच्या विरोधात; मुंबई हायकोर्ट

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

अनेकदा पॉक्सो च्या तक्रारीमध्ये मुलांना व पालकांना पोलीस ठाण्यात बोलावले जाते. मात्र हा संपूर्ण प्रकार चुकीचा असल्याचे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. तसेच पॉक्सो केसमध्ये लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावणे हे संपूर्ण कायद्याच्या विरोधात आहे असे ही मुंबई हायकोर्टाने सुनावले आहे. पोलिस असा प्रकार कसे करु शकतात ?असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाने एमआयडीसी पोलिस स्टेशनची डायरी हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशाप्रकारे जर पोलिस पीडित आणि तक्रारदारांना छळत असतील तर यापुढे तक्रारदार आत्याचार झाला तरी समोर येणार नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे.

अंधेरीतील एका प्रतिष्ठित शाळेच्या फ्रेंच नागरिकत्व असलेल्या ट्रस्टींना सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यात यावा यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. संबंधित प्रकरणामध्ये परदेशी नागरिकावर तीन वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्काराचा केल्याचा आरोप आहे.या केसमध्ये मुंबई पोलिसांनी पीडित मुलीला व तिच्या पालकांना चौकशीसाठी वारंवार पोलिस स्टेशनमध्ये बोलावल्याची गोष्ट याचिकाकर्त्यांनी बुधवारी हायकोर्टाच्या लक्षात आणून दिली. संबधीत विषयावर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.अशाप्रकारच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पीडित अथवा तक्रारदाराच्या घरी जाऊन चौकशी करणे अपेक्षित असताना हा प्रकार समोर आल्यामुळे कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.