महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंगसाठी चाहत्याने बनवले खास गाणे..

देशात सध्या आयपीएलचा फिवर आहे. देशभरातील चाहते आपल्या आवडत्या क्रिकेट टीमसाठी काहींना काही करताना दिसतात. पुण्याच्या चाकण मधील मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या धोनीच्या चाहत्याने चक्क चेन्नई सुपर किंग टीमला पाठिंबा देण्यासाठी एक रॅप सॉंग तयार केले आहे. स्वप्नील बनसोडे असे या गाण्याच्या निर्मात्याचे नाव आहे.या गाण्याचे शीर्षक ‘दे दणा दण दे’ असे आहे. हे गाणे अवघ्या तीन दिवसात तयार केल्याचे स्वप्नीलने सांगितले. स्वप्नीलचा मूळ व्यवसाय हा मोबाईल दुरुस्तीचा असून त्यांना रॅप तयार करण्याची आवड आहे.

२०१५ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकसाठी भारतीय संघाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी स्वप्नील बनसोडेने आपले पाहिलं ‘अरे अपणी जीत तो होनी है कप्तान महेंद्र सिंग धोनी है’ हे गाणे तयार केले होते. याला क्रिकेट चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. त्यानंतर आता खास महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंगच्या संघासाठी (रॅप) तयार केले आहे. आज पुण्याच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग विरुद्ध राजस्थान रॉयल मध्ये सामना रंगणार आहे,या सामन्याच्या मुहूर्तावर हे रॅप प्रदर्शित केल्याचे स्वप्नीलने सांगितले. स्वप्नील स्वतः गाणे लिहतो आणि संगीत देतो.

हे रॅप महेंद्र सिंग धोनी पर्यंत पोहोचायला हवे असे स्वप्नीलला मनापासून वाटते. त्याने धोनीला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. आता या (रॅप) गाण्याला क्रिकेट चाहते किती प्रतिसाद देतात हे आजच्या सामान्यावरून ठरेलच. परंतु या गाण्याच्या पाठबळावर चेन्नई सुपर किंग जिंकून याच्यावर थिरकणार का हे देखील पाहणेउत्सुकतेचे ठरेल.