अत्याधुनिक ‘मोबाईल ब्लड कलेक्शन व्हॅन’ची ससूनला देणगी

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन
रोटरी क्लब आॅफ पुणे’तर्फे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर रोटेरियन अभय गाडगीळ यांच्या हस्ते अत्याधुनिक मोबाईल ब्लड कलेक्शन व्हॅन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आहे.
“या व्हॅनमुळे ससून रक्तपेढी अधिक सुसज्ज होणार आहे. रक्तसंकलन वाढल्यामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. 2017 मध्ये ससून रक्तपेढीतर्फे सुमारे 187 रक्तदान शिबिरे घेण्यात आली व त्याद्वारे सुमारे 14,502 युनिटचे रक्त संकलन करण्यात आले. 2018 मध्ये 24000 युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. या व्हॅनमुळे रक्तपेढी अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल.” अशी माहीती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी दिली.
ही व्हॅन म्हणजे वातानुकुलित फिरते रक्त संकलन वाहन असून यामध्ये रक्त संकलन करण्याच्या सर्व सोईनी युक्त आहे. एकाचवेळी दोन रक्तदात्यांचे रक्त घेता येणार आहे. रक्त साठवण्यासाठी दोन ब्लड बँक रेफ्रिजरेटर आणि 200 रक्त पिशव्या साठविण्याची व तापमान कायम राखण्याची सुविधा देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील वर्षी ससूनच्या मातृ दुग्धपेढीसाठी लागणारी ‘दुग्ध संकलन व्हॅन’ या रोटरी क्लबने भेट दिली आहे.