उल्हासनगरमध्ये कंपनीत विषारी गॅसगळती, कामगाराचा मृत्यू

उल्हासनगर : पोलिसनामा ऑनलाईन
शहरातील शहाड परिसरात सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळती झाली आहे. यामध्ये एका हंगामी कामगाराचा जागीच गुदमरुन मृत्यू झाला, तर 11 कामगारांच्या नाकातोंडात विषारी वायू गेल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मध्ये शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री नऊ वाजताचा सुमारास गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं. यावेळी एका गॅस पाईपलाईनमधून विषारी गॅसची अचानक गळती सुरु झाली. वायुगळतीनंतर 34 वर्षीय संजय शर्मा यांचा जागीच गुदमरुन मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गॅस गळती रोखणाऱ्या पथकासह अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. गॅसगळती झाल्यावर कंपनीकडून कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुविधा पुरवण्यात आली नसल्याचा आरोप कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हलगर्जीमुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा दावा केला जात आहे.

कंपनीच्या ठेकेदाराच्या माहितीनुसार मयत कामगाराला चार दिवसांचं काम एका दिवसात पूर्ण करण्यास सांगितले होते. यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वीही अनेक कामगारांना विषारी गॅस गळतीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या कंपनीत आजही हंगामी कामगारांना राबवून त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता आहे.

विषारी वायूच्या गळतीत ज्या कामगाराचा मृत्यू झाला त्याच्यासह गंभीर असलेल्या इतर कामगारांची देखील नावे समजलेली नाहीत . अकरा जणांवर उपचार सुरु असून पाच कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा आकडा नंतर ११ वर गेला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या बाबत वृत्त दिले आहे. ज्या कामगारांना विषारी वायूची बाधा झाली आहे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती कंपनीचे संचालक ओ. आर. चिंतलगिया यांनी दिली आहे.