जुगार खेळत असणारे ५ पोलीस कर्मचारी निलंबित

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन
जुगार खेळत असताना पकडण्यात आलेल्या ५ पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. वाशिम येथील पोलीस अधिक्षक कार्य़ालयाच्या आवारात हे पाच पोलीस कर्मचारी बुधवारी (दि. 28) रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास जुगार खेळताना आढळून आले होते. या घटनेमुळे वाशिम पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मोटर परिवहन विभागात कार्य़रत असणारे पोलीस कॉन्स्टेबल उमेश पांडूरंग कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर नामदेव पोहरे (नेमणुक पोलीस स्टेशन वाशिम शहर), पोलीस कॉन्स्टेबल अमोल ज्ञानेश्वर शेळके (नेमणुक पोलीस स्टेशन आसेगांव), अनिल देवराव हटकर (नेमणुक पोलीस मुख्यालय, वाशिम), नागोराव भगवानराव खंडके (नेमणुक पोलीस स्टेशन,वाशिम ग्रामीण) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

पोलिसांकडून अवैध जुगार खेळणारे, जुगार आड्डा चालवणारे यांचेवर कारवाई करण्यात येते. पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईमुळे अशा अवैध धंद्यावर आळा बसत आहे. परंतु बुधवारी रात्री अधीक्षकांनी क्युआरटी/आरसीपी हॉल येथे अचानक भेट दिली. यावेळी काही पोलीस कर्मचारीच जुगार खेळताना आढळून आले. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना निलंबीत केले.
निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा-यांना निलंबन कालावधीत पोलीस मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे. निलंबन काळात पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच दररोज सकाळ आणि संध्याकाळी गणणेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा-यांना निलंबन काळात मूळ वेतनाच्या ५० टक्के वेतन मिळणार आहे.