नगर शिवसैनिक हत्याकांडापूर्वी सुनेचे भानुदास कोतकरांशी संभाषण

अहमदनगर :पोलीसनामा ऑनलाईन

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडापूर्वी नगरसेविका सुवर्णा कोतकर यांचे सासरे भानुदास कोतकर यांच्याशी बोलणे झाले असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचे न्यायालयात सांगितले आहे. तसेच नगरसेवक विशाल कोतकर याने संदीप गुंजाळ याला फोन केल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे.

मंगळवारी पहाटे कामरगाव येथून पकडलेला नगरसेवक विशाल कोतकर व पोलिस कोठडी संपलेल्या रवि खोल्लम या दोघांना काल (दि. 24) दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात बोलताना तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले की, ‘रवि खोल्लम याला मयत संजय कोतकर याने भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ, दमदाटी केली. हा संवाद खोल्लम याने रेकॉर्डिंग केला होता. दमदाटी करून संजय कोतकर हे खोल्लम याच्या घरी निघाले होते. या धमकीनंतर खोल्लम याने नगरसेवक विशाल कोतकर याला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर विशाल हा भानुदास कोतकर यांच्या घरी होता. खोल्लम हा बी. एम. कोतकर याच्यासमवेत भानुदास कोतकर यांच्या घरी गेला. हे कॉल रेकॉर्डिंग सुवर्णा कोतकर यांना ऐकविण्यात आले. त्यांनी सासरे भानुदास कोतकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर नगरसेवक विशाल कोतकर याने संदीप गुंजाळ याला फोन केला व काही वेळानंतर खुनाची घटना घडलेली आहे.

एका खुनाच्या प्रकरणात जामिनावर जिल्ह्याबाहेर वास्तव्य करणार्‍या भानुदास कोतकर याच्यासोबत सून सुवर्णा कोतकर यांचे नेमके काय संभाषण झाले? याचा तपास करायचा आहे. त्या कटात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, अशा अनेक प्रश्नांची उकल आता होणार आहे. एकमेकांच्या सामोरासमोरही चौकशा केल्या जाणार आहेत. पोलीस तपास सुरु असून आणखी काही पुरावे समोर येणार आहेत. लवकरच सुवर्णा कोतकर आणि भानुदास कोतकर यांच्यात काय संभाषण झाले आहे त्याचा तपास सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान, सूत्रधार विशाल कोतकर याला मंगळवारी पहाटे कामरगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. त्याच्यासह रवि खोल्लम याला शुक्रवारपर्यंत (दि. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.