पंढरपूरमध्ये अपक्ष नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन

पंढरपूर नगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून गंभीर जखमी केले होते. त्यांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्यांना सोलापूरला हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत करण्यात आले. या प्रकारामुळे पंढरपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

संदीप पवार हे दुपारी एकच्या सुमारास स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आले होते. त्यावेळी सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याना पोलीस व्हॅनमधून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी प्रथमोचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण स्थिती असून, सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहे. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या घटनेत 6 ते 7 आरोपी असावेत अशी शंका जिल्हा पोलिस प्रमुख प्रभू यांनी व्यक्त केली. आरोपींच्या तपासाकरीता 3 पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून 5 गोळ्या सापडल्या आहेत. तसेच जवळच एक कोयता ही आढळून आला आहे. सिसिटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्यात येत असल्याचेही प्रभू यांनी संगीतले.