पीएनबी घोटाळ्यात विपूल आंबानीला सीबीआय कडून अटक

मुंबईः पोलिसनामा आॅनलाईन

सीबीआयने पीएनबी घोटाळा प्रकरणात कारवाईचा सपाटा लावला आहे. सीबीआयने आज फायरस्टार इंटरनॅशनलचा अध्यक्ष विपुल अंबानी, अधिकृत स्वाक्षरीकर्त्या कविता माणकिकर, नक्षत्र ग्रुपचा सीएफओ कपिल खंडेलवाल, वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, गीतांजलीचा व्यवस्थापक नीतेन सेठी या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पीएनबी घोटाळ्याशी संबंधित एकूण सहा जणांना सोमवारपर्यंत अटक करण्यात आली होती. आता हा आटकेचा आकडा ११ वर पोहचला आहे. ११ हजार ३०० कोटींना चुना लावून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी फरार झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मंगळवारीच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. अशात आता सीबीआयने याप्रकरणी धडक कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती ‘एएनआय’ ने दिली आहे.

धीरुभाई अंबानी यांचा विपुल अंबानी हा पुतण्या आहे. तसेच मुकेश अंबानी यांचा चुलत भाऊ आहे. त्याचप्रमाणे तो नीरव मोदीच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे. सीबीआयने रविवारीच विपुल अंबानीची पाच तास कसून चौकशी केली होती. फायरस्टार इंटरनॅशनल या कंपनीसाठीचे आर्थिक व्यवहार विपुल अंबानीला ठाऊक होते. त्याच्या सहमतीनेच हे व्यवहार झाल्याचीही माहिती समोर आली आहे.